बैलाच्या जागी पत्नीला जुंपून शेतकऱ्याची शेतात मशागत! देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील हृदयद्रावक वास्तव; शासनाच्या ‘आर्थिक महासत्ते’च्या गप्पा हवेतच?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे देश आणि राज्य आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असल्याच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र बळीराजाची अवस्था किती दयनीय झाली आहे. याचा एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार देवणी तालुक्यात समोर आला आहे. मागील दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा बैल जागीच ठार झाला. नवीन बैल घेण्यासाठी खिशात दमडी नाही आणि शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर पेरणीचा हंगाम हातातून जाऊ नये म्हणून हतबल झालेल्या या शेतकऱ्याने बैलाच्या जागी चक्क आपल्या पत्नीला जुंपून शेताची नांगरणी व मशागत सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड हे आपल्या शेतात मशागतीची कामे करत होते. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याच दरम्यान शेतात वीज कोसळून गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, या अस्मानी संकटामुळे गायकवाड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतीचा मुख्य आधार असलेला जोडीदार गेल्यामुळे ते पूर्णपणे खचले.

​शासकीय मदतीची केवळ प्रतीक्षा, शेतकरी हतबल!

​बैल दगावल्यानंतर नवीन बैल खरेदी करण्यासाठी काशिनाथ गायकवाड यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळेल, अशी रास्त अपेक्षा त्यांना होती. मात्र, नेहमीप्रमाणेच सरकारी अनास्थेमुळे कोणतीही मदत वेळेत मिळाली नाही. मृग नक्षत्र सुरू झाले असून पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. शेत पडून राहिले तर वर्षभर खायचे काय? या विवंचनेपोटी अखेर या शेतकऱ्याने एक टोकाचा पाऊल उचलले.

​एका बाजूला बैल, दुसऱ्या बाजूला पत्नी!

​जोडीदार बैल गेल्यामुळे नांगर कसा ओढायचा, हा प्रश्न समोर होता. शेवटी पर्याय न उरल्याने काशिनाथ गायकवाड यांनी नांगराला एका बाजूला उरलेला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला आपली पत्नी औशाबाई काशिनाथ गायकवाड यांना जुंपले. एका महिलेला बैलाच्या जागी उभं राहून नांगर ओढावा लागत असल्याचे हे चित्र पाहून पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले.

​शेतकऱ्यांमधून तीव्र संताप; तात्काळ मदतीची मागणी

​आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था किती भीषण आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सरकार केवळ योजनांचे कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. पण प्रत्यक्ष मैदानात शेतकरी उघड्यावर पडला आहे. समाज माध्यमातून या पीडित माध्यमातून या शेतकऱ्याची व्यथा समोर येत असून, शासनाने कोणतीही तांत्रिक कारणे पुढे न करता काशिनाथ गायकवाड यांना तात्काळ आणि भरीव आर्थिक मदत करावी, जेणेकरून त्यांना नवीन बैल घेता येईल, अशी तीव्र मागणी आता संपूर्ण देवणी व लातूर जिल्हा शेतकरी वर्गातून केली जात आहे.