ममता बॅनर्जी यांच्या घरी CID दाखल, ‘सिग्नेचर स्कँडल’ प्रकरणाच्या तपासात सर्च वॉरंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोरील संकटात मंगळवारी अधिक वाढ झाली आहे. बनावट स्वाक्षरी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक ममता बॅनर्जी यांच्या घरी पोहोचले आहे. ममता बॅनर्जी आधीच पक्षात पडलेल्या फुटीचा सामना करत आहेत.

शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याचे समर्थन करणाऱ्या आणि विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरल्या गेल्याच्या आरोपाचा तपास सीआयडीचे पथक करत आहे.

तृणमूलच्या दोन आमदारांनी — ऋतब्रत बॅनर्जी आणि संदिपन साहा — २७ मे रोजी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना माहिती दिल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली; पक्षाने अध्यक्षांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात दावा केल्याप्रमाणे पक्षाच्या ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ‘विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत कोणताही ठराव मंजूर करण्यात आला नव्हता’ आणि त्या दोघांनी १९ मे रोजी म्हणजेच नंतरच्या तारखेला बैठकीच्या रेझोल्युशन बुकवर स्वाक्षरी केली होती, असे या आमदारांनी सांगितले.

या दोन्ही आमदारांनी असा आरोप केला की ६ मे चा तो तथाकथित ठराव ‘बनावट आणि खोटा तयार करण्यात आला’ होता आणि त्यातील ७० स्वाक्षऱ्यांपैकी तब्बल १४ स्वाक्षऱ्या या ‘ब्लॉक लेटर्स’ मध्ये होत्या.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सार्वजनिकरित्या या दोघांची नावे उघड केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तृणमूलने ‘पक्षविरोधी कारवायांचा’ आरोप करत दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.