PoK मधील परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार, हिंदुस्थानने सुनावले खडेबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे लष्कर पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) सरकारविरोधी उठणारे आवाज दाबण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडत आहे. हिंदुस्थानने मंगळवारी पीओकेमध्ये सुरू असलेली अशांतता आणि पोलिसांच्या क्रूरतेवरून पाकिस्तानवर सडकून टीका केली. पीओकेमध्ये सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये आतापर्यंत किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला त्यांच्या या चुकीच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी भूमिका हिंदुस्थानने मांडली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर खोट्या बातम्या आणि व्हिडीओ प्रसारित करत असल्याचा गंभीर आरोप केला. पाकिस्तानच्या या कृतीला त्यांनी स्वतःच्या अंतर्गत अपयशांवर पांघरूण घालण्याचा आणि बळकावलेल्या प्रदेशातील मानवाधिकार उल्लंघनावरून जगाचे लक्ष विचलित करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “या संदर्भात आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या खोट्या बातम्या आणि व्हिडीओंचा एक पॅटर्न पाहत आहोत. पाकिस्तानचा हा त्यांच्या अपयशांना लपवण्याचा आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून लक्ष हटवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून पोलिसांच्या क्रूरतेच्या अत्यंत गंभीर बातम्या येत आहेत. ज्यामध्ये अनेक निदर्शकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला त्यांच्या या कुकृत्यांसाठी आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी नक्कीच जबाबदार धरेल, अशी आम्हाला आशा आहे.”

दरम्यान, सुरक्षा दल आणि निदर्शक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकींनंतर पीओकेमधील तणाव वाढला असून तेथून अनेक चिंताजनक बातम्या येत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार आणि सरकारी आकडेवारीनुसार, रविवारी रात्री रावळकोट येथे झालेल्या हिंसाचारात आणि गोळीबारात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक पाकिस्तानी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, मृतांचा खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असू शकतो आणि तिथे डझनभर लोकांचा बळी गेला आहे.