रात्री जेवणानंतर अचानक तब्येत बिघडली, दोन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्री जेवणानंतर एकाच कुटुंबातील तिघांची तब्येत बिघडल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोन मुलांचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात रबूपुरा येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने रविवारी रात्री आपल्या दोन्ही मुलांसोबत जेवण केले. जेवणानंतर काही वेळातच तिघांनाही उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची तब्येत बिघडत गेली. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यानंतर 8 वर्षाच्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिला आणि 5 वर्षाच्या मुलावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलील घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.