
मध्य प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपने आक्षेप घेतला होता. हा अर्ज रद्द झाल्यामुळे आता राज्यातील राज्यसभेच्या तिन्ही जागांवर भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
उमेदवारी अर्ज रद्द होण्याचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. भाजपने आरोप केला होता की, मीनाक्षी नटराजन यांच्यावर तेलंगणा राज्यामध्ये एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी या गुन्ह्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली होती. याच माहिती लपवल्याच्या आधारावर त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.
भाजप नेत्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, नटराजन यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर तेलंगणात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपशील दिलेला नाही. याशिवाय त्यांची संपत्ती आणि बँक खात्यातील शिल्लक रकमेचा संपूर्ण तपशीलही उमेदवारी अर्जात स्पष्टपणे देण्यात आलेला नाही, असा आरोप भाजपने केला होता. यातच आता त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.



























































