
मुंबईत भाजपची सत्ता आल्यापासून पाण्याची समस्या वाढली असून, भाजपला शासन चालवता येत नाही, अशी सडकून टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शहरात आजही पाण्याची मोठी कमतरता जाणवत आहे. प्रशासनाकडून केवळ १० टक्के पाणीकपात केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात ही पाणीकपात त्यापेक्षा जास्त केली जात असल्याचे ते म्हणाले आहेत. मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
पाण्याच्या प्रश्नासोबतच त्यांनी रस्ते आणि विजेच्या समस्येवरही भाष्य केले. रस्ते बांधणीतही मोठा घोटाळा झाला असून तो आम्ही उघडकीस आणला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गोरेगाव उड्डाणपुलाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, या पुलावर २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, पण तिथे खड्डे आणि रस्त्याची दुर्दशा स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. याशिवाय शहरात विजेची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या सर्व समस्यांचे एकच कारण आहे की, भाजपला शासन चालवता येत नाही. त्यांना केवळ जाहिरातबाजी आणि सोशल मीडिया चालवणे इतकेच येते, त्यांना बाकी काहीही येत नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.


























































