
श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणगीच्या रकमेत कथित गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आता थेट पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) दरबारी पोहोचला आहे. भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केल्यानंतर दिल्लीतून तातडीने सूत्रे हलली आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी तडकाफडकी अयोध्येचा दौरा करत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड गुप्त बैठक घेतल्याने या प्रकरणातील चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
सोमवारी अचानक अयोध्येत दाखल झालेल्या नृपेंद्र मिश्रा यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि मंदिर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली, ते वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण बैठक अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली असून, तिचा कोणताही अधिकृत तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुप्त बैठकीनंतर मिश्रा मंगळवारी सकाळी थेट दिल्लीला रवाना झाले. देणगी घोटाळ्याच्या आरोपानंतर लगेचच झालेला हा दौरा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अत्यंत कळीचा मानला जात आहे. या बैठकीतील निष्कर्षांचा सविस्तर अहवाल आता थेट दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे. “श्रीराम मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक आहे. त्यामुळे देणगी, अर्पण किंवा मंदिर व्यवस्थापनावर लागणाऱ्या कोणत्याही आरोपाची पारदर्शक चौकशी होणे गरजचे आहे. आरोप खोटे असतील, तर सत्याचा उलगडा व्हायला हवा आणि खरोखरच जर कुठे पाणी मुरत असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. हा प्रश्न आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित नसून तो उत्तरदायित्व आणि भाविकांच्या विश्वासाचा बनला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देणगीतील या कथित गैरव्यवहाराला सर्वातआधी समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी वाचा फोडली होती. त्यानंतर सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दर महिन्याला न चुकता अयोध्येला भेट देऊन रामलल्ला आणि हनुमानगढीचे दर्शन घेतात. अशा परिस्थितीतही जर हा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले, तर तो नेमका किती काळापासून सुरू होता, याचा छडा लावणे तपास यंत्रणांसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.



























































