5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या; नातेवाईकाला अटक

देशभरात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना  उत्तर प्रदेशात घडली आहे. पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. चिमुरडीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह शेतातील धान्याच्या पेंढीत लपवण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मुलगी हरवल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर या घटनेचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या एका 42 वर्षांच्या नातेवाईकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मरका ठाणे परिसरात रविवारी सायंकाळी एक पाच वर्षांची मुलगी घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी एक नातेवाईक तिथे आले. मुलगी त्यांना ओळखत होती. ते या मुलीला फूस लावत तसेच चॉकलेटचे प्रलोभन दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्या नातेवाईकाने मुलीला घरी नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्याने तिचे प्रेत शेतातील धान्याच्या पेंढीत लपवून ठेवले होते.

अंगणात खेळणारी मुलगी बराच वेळ झाला तरी घरात आली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. ती कुठेच सापडली नाही. मुलगी सापडत नसल्याने कुटुंबियांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

पोलीस निरीक्षक भास्कर मिश्रा यांनी या घटनेबाबत सांगितले की, अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या घराजवळच असलेल्या शेतातील भाताच्या पेंढीत लपवून ठेवण्यात आला होता. घटनेचा उलगडा झाल्यावर मुलीच्या आरोपी नातेवाईकाला सोमवारी सकाळी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची कसून चोकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या