पाचगणीत पर्यटनाला ब्रेक; सर्व पॉइंट्सची नाकाबंदी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीमुळे पाचगणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी सर्वच पर्यटन पॉइंटची नाकाबंदी केली असल्याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली. त्यामुळे उत्साही पर्यटकांच्या पाचगणीतील पर्यटनाला ब्रेक लागला आहे.

पाचगणी पर्यटनस्थळावर वीकेण्डमुळे शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना पाचगणीत येण्यास मज्जाव केला आहे.जोपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत पाचगणीचे पर्यटन सुरू होणार नाही, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिला आहे.

शासनाने जिल्हाबंदी व इतर निर्बंध कमी केले असले तरी अद्यापही पर्यटनस्थळे खुली करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे गर्दी वाढून कोरोनाचा संसर्गही फैलावू नये, यासाठी आम्ही शहरातील टेबल लॅण्ड, पारशी पॉइंट, सिग्ने पॉइंट या सर्व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते सध्या बंद केले आहेत. तरीही या नियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पाचगणी

पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने सर्व पॉइंट्सचे रस्ते सुरक्षेसाठी बंद केले आहेत. पर्यटकांना पर्यटनासाठी परवानगी मिळाली नसल्याने कोणीही पॉइंटकडे जाऊ नये, असे आवाहन पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने कोरोनाचे निबंध उठवून जिल्हा बंदी आदेश रद्द केले. त्यामुळेच लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या पुणे, मुंबईसह परगावांतील नागरिकांची पावले निसर्गसंपन्न पाचगणीकडे वळू लागली. परंतु, येथील कोरोनाची सद्यस्थिती पाहाता सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यटन अद्यापही खुले केलेले नाही. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे येणारी गर्दी येथील प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.

मोठ्या संख्येने पर्यटक पाचगणी व महाबळेश्वरकडे येऊ लागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी स्थानिक पालिका प्रशासनाने व पाचगणी पोलिसांनी पॉइंटकडे जाणारे सर्व रस्ते अडथळे टाकून बंद केले आहेत. याशिवाय याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे सध्या तरी पर्यटकांना पाचगणी व महाबळेश्वरचे दरवाजे बंदच आहेत.

पाचगणी येथील लॉजिंग व्यवसायालाही बंदी असल्याने याठिकाणी येणारे सर्व पर्यटक खासगी बंगल्यांवर उतरले आहेत. मात्र, पर्यटनस्थळे बंद असली तरी येथे येणारे पर्यटक सध्या पडलेल्या पावसामुळे हिरव्याकंच झालेल्या डोंगररांगा व निसर्ग पाहूनच परतीच्या वाटेला लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या