अटक न करण्यासाठी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हे शाखेतील पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

मोबाईलच्या दुकानात चोरीचे मोबाईल खरेदी केले असल्याचे सांगत चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील पोलीस शिपायासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

दिपक प्रल्हाद क्षिरसागर (वय 34, नेमणूक- गुन्हे शाखा युनीट-3), खाजगी व्यक्ती सिमोन अविनाश साळवी,(वय- 27) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाचे मोबाईल खरेदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात चोरीचे मोबाईल खरेदी केले म्हणून तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करून अटक न करण्यासाठी पोलिस अंमलदार दीपक क्षीरसागर याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या भावाकडे 2 लाख रुपये मागितले. यानंतर तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारले. यासाठी क्षीरसागर याने खासगी व्यक्तीला मध्यस्ती केले. पुणे एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पथकाने सापळा लावून सिमोन साळवी यांच्यामार्फत तीस हजार रुपयाची लाच घेताना दोघांना पकडले. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.