लाच मागितली पण स्वीकारली नाही, नायब तहसीलदारासह खासगी संगणक चालकाविरुध्द गुन्हा दाखल

60

सामना प्रतिनिधी । लातूर

रेशन कार्डामध्ये पत्नीचे नाव ऑनलाईन समाविष्ट करण्यासाठी खासगी संगणक चालकाने शंभर रुपयाची लाच मागितली. नायब तहसीलदारांनी पन्नास रुपये देण्यास सांगितले. नंतर संशय आल्याने रक्कम स्वीकारली नाही परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवरही १४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराच्या पत्नीचे नाव रेशन कार्डमध्ये ऑनलाईन समाविष्ट करण्यासाठी खासगी संगणक चालक आकाश साळुंके खाडगाव रोड लातूर त्याने शंभर रुपयाची लाच मागितली होती. लातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शिवाजी मारुती पालेपाड यांनी तक्रारदारास पन्नास रुपये द्या असे सांगितले. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ आणि १० मे रोजी सापळा लावला. परंतु संशय आल्याने आकाश साळुंके यांनी रक्कम स्वीकारली नाही. १४ मे रोजी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार दराडे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या