धक्कादायक! वेणी कापल्याच्या संशयावरून मांजरीचा बळी 

38

सामना ऑनलाईन । हरयाणा

नवी दिल्ली, हरयाणा, व मध्य प्रदेशमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या वेणी गँगच्या दहशतीने लोकांनी आग्रा येथे एका वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून तिचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आता हरयाणा येथेही वेणी गँग हा भुताटकीचा प्रकार असल्याचे समजून जमावाने एका निष्पाप मांजरीची मानच पिरगळून तिला ठार केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हरयाणातील मेवात जिल्हयातील नगीना येथे बुखारा गावात रात्रीच्या वेळेस कोणीतरी एका महिलेची वेणी कापली. झोपेतून उठल्यानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. त्याचवेळी एक मांजर तिच्या खाटेजवळ बसल्याचे तिने बघितले. महिलेने ही गोष्ट तात्काळ पतीला व इतरांना सांगितली. त्यानंतर गावातल्यांनी वेणी कापण्याचा संबंध जादू टोण्याशी लावत मांजर हीच ती भुताटकी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जमावाने त्या मांजराला उचलून जमिनीवर आपटले पण एवढ्यावर त्यांचे समाधान न झाल्याने गावकऱ्यांनी तिची मानच पिरगळली. यात त्या निष्पाप मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर वेणी कापणाऱ्या भुताटकी मांजराला ठार केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

दोन दिवसांपूर्वीही आग्रा येथे एका महिलेची वेणी कापल्याच्या संशयावरुन लोकांनी एका वृद्ध महिलेला चेटकीण ठरवले होते व तीला बेदम मारहाण केली होती. त्यात त्या वृद्धेचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या