शौचालयातील मैला काढताना गॅसमुळे गुदमरुन एका सफाई कामगाराचा मृत्यू

55

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

शौचालयातील मैला काढताना त्यातील गॅसमुळे गुदमरुन टाकीत पडल्यामुळे एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ आहे. बेलापूर खूर्द येथील हुरे वस्तीवर काल सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे असे मयत झालेल्या मजुराचे नाव आहे.

बेलापूर खूर्द येथील सुकदेव पुजारी यांनी शौचालयातील मैला काढण्याचे काम बेलापूर बुद्रुक येथील मैला काढण्याचे खासगी काम करणारे रवी राजु बागडे व ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे यांना दिले होते. मैला असलेली टाकी पाच फुट खोल होती. त्यांनी टाकीवरील झाकण बाजूला काढून टाकीत उतरताच गँसमुळे ज्ञानेश्वर हा बेशुध्द पडला अन मैला असलेल्या टाकीत पडला. त्याला मदत करण्यासाठी रवी बागडे खाली उतरला पण तोही बेशुध्द पडला. आसपासच्या नागरीकांनी तातडीने दोघांनाही बाहेर काढले आणि दोघानांही तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे हा मयत झाल्याचे घोषीत केले. रवी बागडे याच्यावर उपचार सुरु असतानाच प्रकृती खालावल्यामुळे त्याला प्रवरा नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रवी बागडे याची प्रकृती गंभीर आहे.

दोन्ही कुटुंबांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून मिळेल ते काम करुन हे दोघेही आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालवत होते. ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परीवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या