शेतकरी करत होता नांगरणी, सापडला सोन्याने भरलेला हंडा

245
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । गांधीनगर

नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्याला शेतात चक्क सोन्याने भरलेला हंडा सापडल्याची घटना गुजरात येथील धरमपूर येथे घडली आहे. या हंड्यात सोन्याचे दागिने आणि देवी देवतांच्या सोन्याच्या मूर्ती सापडल्या आहेत.

धरमपूर येथे राहणारा जुगेश्वर राजवाडे हा शेतकरी तरुण १२ जून रोजी सकाळी सहा वाजता आपल्या शेताची नांगरणी करत होता. तासाभरात जवळपास सगळं शेत नांगरून झाल्यानंतर शेताचा शेवटचा भाग नांगरत असताना त्याचा नांगर एका धातुच्या वस्तूला आपटला. नांगर नेमका का थांबला ते पाहण्यासाठी त्याने जमीन उकरून बघितली. तेव्हा त्याला तिथे एक कांस्याचा हंडा सापडला. हंड्याचं तोंड माती लिंपून बंद करण्यात आलं होतं. त्याने माती काढली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हंड्यात सोन्याचे दागिने आणि देवी-देवतांच्या मूर्ती होत्या.

ही बातमी गावात पसरली आणि हा चमत्कार पाहायला सगळा गाव लोटला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सापडलेली संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न केला. पण, ग्रामस्थांनी या गोष्टीला विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ती संपत्ती जुगेश्वरच्या शेतात सापडले आहे त्यामुळे ती त्याची आहे. त्यामुळे सध्या पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या