सीएसएमटी स्थानकावर साडे पाच एकरचा ‘रुफ प्लाझा’

युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत समाविष्ठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी रेल्वे मंत्रालयाने दहा हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सीएस‌एमटी, अहमदाबाद आणि नवी दिल्ली या तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाकरिता हा निधी विभागून देण्यात आला आहे. या आधी सीएसएमटी स्थानकाचा पीपीपी मॉडेलद्वारे विकास होणार होता. आता सरकारच या स्थानकाचा विकास करणार असल्याने वेगाने काम होईल असे म्हटले जात आहे. परंतू या स्थानकावरील सुविधा मात्र महागण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की पहिल्या टप्प्यात 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या निधीला केबिनेटने मंजुरी दिली. यापैकी 46 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. 32 रेल्वे स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे.

विमानतळाप्रमाणे ट्रॅव्हलेटर्सची सोय
रेल्वे स्थानकात दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधां एकाच ठिकाणी असतील. सीएस‌एमटी स्थानकात जवळपास पाच एकर जागेचा रुफ प्लाझा तयार करण्यात येणार आहे आणि त्यावरच फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादने विक्रीची दुकाने , तिकीट खिडक्या यांसारख्या सुविधा तयार केल्या जातील आणि खालच्या बाजूला फलाट असतील. शहराच्या दोन्ही बाजू या स्थानकांनी जोडल्या जातील. शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांत सिटी सेंटरसारखी जागा शॉपिंगसाठी तयार केली जाईल. रेल्वे स्थानकांना आरामदायी करण्यासाठी योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था, स्थानकांच्या सुविधांचे नकाशे, ध्वनिव्यवस्था, लिफ्ट, सरकते जिने, विमानतळाप्रमाणे ट्रॅव्हलेटर्स असतील. पार्किंग व्यवस्था आदी सुविधांचा बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे.

परिवहन सेवांचे एकात्मिकरण
मेट्रो, बस,टॅक्सी इत्यादीं परिवहन सेवांचे एकात्मिकरण स्थानकात करण्यात येईल. सौर उर्जा, प्रकल्प, जल संवर्धन, आणि रेन हार्वेस्टीक प्रकल्प आदी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. दिव्यांगांसाठी हे स्थानक अनुकूल असेल. इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील. प्रवाशांच्या आगमन आणि प्रस्थान यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. संपूर्णपणे आच्छादन असलेले फलाट असतील. सीसीटीव्ही आणि ईतर सुरक्षा यंत्रणेने ही स्थानके सुसज्ज असतील.