दिल्ली हादरली, एक दिवसाच्या सुट्टीसाठी मदरशात पाच वर्षीय मुलाची हत्या

दिल्लीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. ईशान्य दिल्लीतील दयालपूर परिसरात मदरशात पाच वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मदरशातील 9 ते 11 वर्षे वयोगटातील तीन मुलांनी ही हत्या केली. मदरशातून एक दिवसाची सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केल्याचे चौकशीत सांगितले. तिन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलगा पश्चिम दिल्लीच्या पंजाबी बाग परिसरात आईसोबत राहत होता. मुलाचे वडील नोकरीनिमित्त उत्तर प्रदेश येथे राहतात. पाच महिन्यांपासून मुलगा मदरशात शिकत होता.

मुलगा आजारी असल्याचे त्याच्या आईला शुक्रवारी मदरशातून सांगण्यात आले होते. आईने तात्काळ मदरशात धाव घेत मुलाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर आईने मुलाचा मृतदेह मदरशात घेऊन गेली. मदरशाबाहेर आईसह परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले.

पोलिसांनी आंदोलनस्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. शवविच्छेदनावेळी मानेवर, पोटावर आणि मांडीच्या भागावर फोड आढळून आले. मुलाच्या शरीरावर अंतर्गत गंभीर जखमाही आढळून आल्या.

पोलिसांनी मदरशातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता मुलाच्या हत्येमध्ये तीन विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन हत्येबाबत स्वतंत्रपणे चौकशी केली. मुलाने त्यांचा अपमान केला म्हणून भांडण झाल्याचे एकाने सांगितले. मदरशातून एक दिवस सुट्टी हवी होती म्हणून त्यांनी त्या मुलाची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले.

मदरशात एकूण 250 विद्यार्थी शिकत होते. या घटनेनंतर मदरशातील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. टीव्हीवर क्राईम शो पाहून तीन मुलांनी ही हत्या केल्याचे कळते.