उत्तर प्रदेशमधील न्यूरोलॉजिस्ट पदावरील महिलेला डिजिटल अटकेची भीती दाखवून तब्बल 2.8 कोटी रुपयांना फसवले. डॉ. रुचिका टंडन असे या पीडित महिलेचे नाव असून त्यांच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. टंडन यांना ट्राय प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्याकडून पहिला कॉल आला होता. तुमच्या मोबाइल क्रमांकावर 22 तक्रारी दाखल झाल्या असून लवकरच तुमचा मोबाइल नंबर बंद होईल, असे टंडन यांना सांगतिले. त्यानंतर त्यांना स्काय पे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तुमचे नाव मनी लॉण्डरिंग प्रकरणात गुंतले असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
टंडन यांच्या बँक खात्यात असलेल्या पैशांचा हिशोब करावा लागेल. यासाठी हे पैसे सरकारच्या अकाऊंटमध्ये हस्तांतरित करावे लागेल. खातरजमा झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात पुन्हा वळते करण्यात येतील, असेही डॉ. टंडन यांना सांगितले. त्यांच्या बँक खात्यातून पहिल्यांदा एक कोटी हस्तांतरित केले. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत आणखी 1.8 कोटींची रक्कम विविध खात्यांत वळती केली. मात्र तरीही समोरून वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्यानंतर डॉ. टंडन यांना संशय आला.
काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’?
‘डिजिटल अरेस्ट’ नावाचा फंडा सायबर गुन्हेगार वापरत आहेत. या गुन्हेगारांची टोळी पीडितांना पोलीस, ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग, लष्करी अधिकारी असल्याचे सांगतात. देशविघातक कृत्य, बेकायदेशीर वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ करावी लागेल, असे सांगतात. यात पीडित व्यक्तीला 24 तासांपर्यंत त्याच्याच घरात व्हिडीओ कॉलवर बंदिस्त राहायला सांगितले जाते.