खडी क्रशरच्या सुरुंगस्फोटाने कुकडी कालव्यात दरड कोसळली

पठारवाडी (निघोज, पारनेर) येथील कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात (किलोमीटर क्रमांक 49) मोठी दरड कोसळली. त्यामुळे पाण्याचा फुगवटा तयार झाल्याने कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, कालव्यातील पाणी इतरत्र वळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी (दि. 14) संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या खडी क्रशरमुळे दरड कोसळली असल्याचे पठारवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कुकडी डाव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. कालवा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. दरड कोसळल्याने कालव्यात पाण्याचा मोठा फुगवटा तयार झाला. त्यामुळे कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱयांना कालव्यात दरड कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर कालव्यातील पाणी इतरत्र वळवण्यात आले. त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका सध्यातरी टळला आहे.

ज्या ठिकाणी दरड कोसळली त्यामागे, तीन किलोमीटर अंतरापर्यंत, निघोजपासून पठारवाडीपर्यंत मातीचा भराव टाकून कालवा तयार करण्यात आला आहे. दगड खाणीसाठी वारंवार केल्या जाणाऱया सुरूंगांच्या स्फोटांमुळे मातीचा भराव फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कालव्याच्या बांधकामासाठी लागणारा दगड, खडी, मुरुम उपलब्ध व्हावा, यासाठी पाटबंधारे विभागाने पन्नास वर्षांपूर्वी पठारवाडी परिसरात दगडखाण व खडी क्रशर सुरू केले होते. त्यासाठी 40 एकर जमीन संपादित केली होती. कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दगड खाण व क्रशर बंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्या जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे दोन दगड खाणी व क्रशर सुरू केले आहेत. त्यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला असल्याचे पठारवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे कठीण खडक असलेल्या परिसरातील दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हा धोक्याचा इशारा आहे. भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी संबंधित विभागांनी उपाययोजना कराव्यात.

 – ऍड. रामदास घावटे, सामाजिक कार्यकर्ते, जवळे