शिर्डी ते मुंबई प्रवासात मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पकडले

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिर्डी ते मुंबई प्रवासादरम्यान खासगी बसमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने शोधून काढले. सोपान निवृत्ती उगले असे या नराधमाचे नाव असून तो बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीला आहे.

मालाडच्या कुरार येथे राहणारे एक कुटुंब १३ जून रोजी खासगी बसने शिर्डीहून मुंबईला यायला निघाले. हे दांपत्य आपल्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन सीटवर बसले. पण दोन सीटवर तिघांना अडचण होत असल्याने त्यांनी मागे रिकामी असलेल्या सीटवर मुलीला झोपवले. मुलीच्या बाजूला एक अनोळखी प्रवासी बसला होता. १४ जूनला सकाळी हे दांपत्य मुलीला घेऊन मालाडला उतरले आणि घरी गेले. मुलीला त्रास होत असल्याने तिने बसमधील सर्व प्रकार आईला सांगितला. पालकांनी थेट कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

कुरार पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सचिन गवस, सहायक निरीक्षक विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, उपनिरीक्षक विजय कदम, तावडे, वारे, गायकवाड, सावंत, भोसले यांच्या पथकाने नराधमाचा शोध सुरू केला. चौकशीमध्ये रात्री १०:३० वाजता एक अनोळखी इसम संगमनेर येथे बसमध्ये चढल्याचे समजले. पोलिसांनी ट्रव्हल्स एजन्सीकडून या प्रवाशाची माहिती मिळाली. या इसमाचे नाव सोपान उगले असून तो गोरेगाव बेस्ट बस आगार येथे चालक म्हणून नोकरी करीत असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून पळण्याच्या तयारीत असलेल्या सोपानच्या मुसक्या आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या