तक्रारदारच निघाला आरोपी बारा लाखांच्या लुटमारीचा बनाव

प्रतिनिधी । मुंबई

१२ लाखांची रोकड घेऊन आरे रोडमार्गे जात असताना युनिट नंबर १६ जवळ काही अज्ञात इसमांनी अडविले आणि हातातील पैशांची बॅग हिसकावून पळ काढल्याची तक्रार त्याने आरे पोलिसांत दिली, पण पोलिसांच्या चौकशीत तक्रारदार व त्याच्या सहकाऱ्यांची बोबडी वळली आणि लुटमारीचे बिंग फुटले. लुटमार केल्याचा बनाव रचणारा तक्रारदारच आरोपी निघाला.

मयूर विचले (२१), प्रसाद पाटील (२६) आणि अनिल केंडूसकर (२०) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी हा गोरेगाव येथील लॉजी कॅश सोल्युशल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करतो. विविध बँकांचे ग्राहक तसेच कंपन्यांकडून रक्कम जमा करून ती काम करीत असलेल्या कंपनीत जमा करण्याचे काम करतो. मंगळवारी मयूर आणि प्रसाद यांनी अंधेरी परिसरातील विविध कंपन्यांकडून १२ लाखांची रोकड जमा केली व माघारी ऑफिसमध्ये जाण्यासाठी आरे रोडमार्गे निघाले. दरम्यान, युनिट नंबर १६ जवळ दोन इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना अडविले आणि संधी साधून पैशांची बॅग हिसकावून पळ काढला अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली. पण पोलिसांनी दोघांना उलटेसुलटे प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच मयूर आणि प्रसाद गोंधळले आणि कुठलीही लुटमार झाली नसून आम्ही खोटी तक्रार दिल्याची कबुली दोघांनी दिली. दोघांनी ही रक्कम अनिल याच्या घरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी अनिलच्या घरातून नऊ लाख चार हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून या गुह्यात तिघांनाही अटक केल्याचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.