कसं शक्य आहे ? आरोप सिद्ध होऊनही बायकोला मारणारा नवरा निर्दोष सुटला

39

सामना ऑनलाईन । एडिनबर्ग

पत्नीच्या तोंडावर उशी दाबून केलेल्या हत्येला न्यायालयाने प्रेमात केलेली कृती असा निर्वाळा देण्याची विचित्र घटना समोर आली आहे. ही स्कॉटलंड येथील आयरशायर येथे घडली असून न्यायालयाच्या निर्वाळ्यामुळे पतीची निर्दोष मुक्तताही करण्यात आली.

स्कॉटलंड येथील आयरशायर येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय इयान गॉर्डन नामक इसमाने २०१६मध्ये त्याची पत्नी पेट्रीसिया (६३) हिची तोंडावर उशी दाबून हत्या केली. या हत्येसाठी त्याला अटकही करण्यात आली. हे प्रकरण जेव्हा कोर्टासमोर आलं तेव्हा या हत्येमागच्या कारणाचा खुलासा झाला. पेट्रीसिया ही तब्बल ४३ वर्ष कर्करोगाशी झुंजत होती. अशा प्रकारे क्षणाक्षणाला वेदना भोगणाऱ्या आपल्या पत्नीची सुटका करावी, या हेतून इयानने तिची हत्या केल्याचं समोर आलं.

या प्रकरणी या दांपत्याच्या मुलाचा जबाबही नोंदवण्यात आला. त्यानेही आपल्या वडिलांनी नाईलाजाने हे कृत्य केल्याची साक्ष दिली. तसंच या हत्येनंतर आपल्या वडिलांना नैराश्याने ग्रासल्याचंही त्याने सांगितलं. सर्व साक्षी-पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने इयानने केलेलं कृत्य ही प्रेमामुळे केलेली हत्या आहे, असा निर्णय दिला आणि इयानची मुक्तता केली.

या प्रकरणात न्यायाधीश असणाऱ्या ब्रोडी यांनी निकालात असं नमूद केलं की, हे प्रकरण अन्य प्रकरणांच्या तुलनेने वेगळं आहे. आयुष्याची ४३ वर्षं आपल्या पत्नीला वेदनेने तळमळताना पाहिल्यानंतर इयानसाठी हा निर्णय किती कठीण असू शकतो, याची कल्पना येते. त्यामुळे त्याने केलेलं कृत्य हे पत्नीला त्रासातून मुक्त करण्यासाठी केलेलं आहे, असं न्यायाधीशांनी म्हटलं.

आपली प्रतिक्रिया द्या