विचित्र स्पर्धा जिंकण्यासाठी त्याने ‘हे’ खाल्ले आणि जीभेला आली सूज

853

सामना ऑनलाइन | लंडन

जगभरात अनेक विचित्र स्पर्धा भरवण्यात येतात. अशीच एक विचित्र स्पर्धा इंग्लंडमध्ये नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत एका अवलीयाने विजय मिळवण्यासाठी खाजखुजली या रोपट्याची जास्तीतजास्त पाने खाण्याचा विक्रम केला आहे. खाजखुजलीच्या रोपट्याला स्पर्श झाला तरी असह्य खाज येऊन मनुष्य हैराण होतो. मात्र, स्पर्धा जिंकण्यासाठी टॉनी जेस नावाच्या अवलीयाने तब्बल 29 फूट लांबीच्या खाजखुजलीचे देठाची पाने फस्त करून सर्वांना अचंबित केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाजखुजलीची पाने खाल्ल्यामुळे त्याच्या जिभेला सूज आली असून ओठांनाही प्रचंड खाज सुटली आहे.

इंग्लंडमध्ये खाजखुजलीची विचित्र स्पर्धा जागतिक पातळीवर नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेत 2 फूटांच्या खाजखुजलीच्या देठाची पाने खाण्यापासून सुरुवात करावी लागते. त्यानंतर देठाचा आकार वाढवण्यात येतो. स्पर्धक जास्तीतजास्त 58 फूट लांबीपर्यंतच्या देठाची पाने खाऊ शकतात. या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी स्पर्धकांना एका तासात जास्तीतजास्त आणि मोठ्या आकाराच्या देठाची पाने खावी लागतात. डॉर्सेट शहरातील जेसने इतर स्पर्धकांना मागे टाकत कमीतकमी वेळात 29 फूटांच्या देठांची पाने खाण्याचा विक्रम करत स्पर्धेत विजय मिळवला आहे.

दोन शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या आकाराची खाजखुजलीचे रोपटे उगवले होते. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेबाबतची कल्पना सूचवली. त्यांनी त्यांच्या शेतातील खाजखुजलीचे रोपटे स्पर्धेसाठी स्पर्धकांना उपलब्ध करून दिले होते. या स्पर्धेतील आणखी विचित्र अट म्हणजे स्पर्धेत पराभूत होणाऱ्या स्पर्धकांना पाने खाल्लेले देठही खावे लागते. ही स्पर्धा गंमतीची वाटत असली तरी ती अंगलट येऊ शकते. खाजखुजलीमुळे शरीराला वेदना होतात. असह्य खाजेमुळे अंगाला सूज येते. जेसनेही मोठ्या प्रमाणात या रोपट्याची पाने खाल्ल्याने त्याच्या जीभेला सूज आली असून ओठांना असह्य खाज येत आहे. या वनस्पतीतील फॉर्मिक आम्लामुळे शरीरावर खाज आणि सूज येते. या रोपट्याचा वापर पूर्वी शिक्षा देण्यासाठी केला जात असे.

आपली प्रतिक्रिया द्या