चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या हातापायांवर हातोड्याने घातले घाव

34

सामना प्रतिनिधी । पुणे

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या हातापायांवर हातोड्याने घाव घालून तिला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर येथील धरपळे चौकात घडली. गुरुवारी पुण्यात उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

ज्योती काकडे (वय २५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रणजित सखाराम काकडे (वय ३०, रा. सोमेश्वरवाडी, बाणेर) याला अटक केली आहे. पतीवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित आणि ज्योती हे दोघेही रोजंदारीची कामे करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आहेत. ज्योती या कामावर गेलेल्या असताना घरी यायला त्यांना उशीर झाला. त्यावरून रणजितने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. ज्योती घरी आल्यानंतर त्याने उशीर का झाला यावरून भांडणे सुरू केली. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी हातोड्याने त्यांच्या पायाच्या नडगीवर आणि हातावर घाव घातले. हातोड्याचे जोरदार घाव बसल्याने ज्योती यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी ज्योती यांची आई त्यांना वाचविण्यासाठी पुढे गेल्या असता त्यांनाही रणजितने हाताने मारहाण केली. ज्योती यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रणजितला अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक पालमपल्ले करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या