ग्रुपच्या वर्चस्वाच्या वादातून थेरगावात टोळक्याकडून तरुणाचा खून

27

सामना प्रतिनिधी । पिंपरी

ग्रुपच्या वर्चस्वातून आणि मित्रांमध्ये निंदा केल्याच्या कारणावावरून एका तरुणाचा कोयता व चॉपरने वार करून खून केला.

रूपेश सुखबिर सोराती (वय २४, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या ऊर्फ रोहित डावरे (वय २०), शुभम टकले (वय २०), ईश्वर लोंढे (वय २०, सर्व रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत गायकवाड, योगेश ऊर्फ दादा आणि इतर चार ते पाच जणांविरुद्ध वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश अशोक सायलू (वय २० रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. काळेवाडी परिसरात रूपेश व आरोपी यांचे दोन ग्रुप आहेत. आपल्याच ग्रुपचे वर्चस्व परिसरावर राहावे, यासाठी या दोन ग्रुपमध्ये वारंवार वाद होत. १९ फेब्रुवारीला या दोन ग्रुपमध्ये भांडणेही झाली होती.

त्यावेळी रूपेश याच्यावर मारहाणीचा गुन्हाही दाखल झाला होता. गुरुवारी रात्री राजेश सायलू, राजू खान आणि रूपेश सोराती हे तिघेजण दुचाकीवरून चालले होते. थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ आरोपींनी त्यांना अडवून रूपेशवर कोयता, चॉपर तसेच सिमेंटच्या गट्टूने हल्ला चढविला. यामध्ये गंभीर जखमी झालेला रूपेश उपचारादरम्यान मरण पावला. सहायक पोलीस निरीक्षक स्वामी अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या