भायखळय़ात 62 मजली इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाने केली 30 जणांची सुटका; पोलीस हवालदार जखमी

भायखळामधील खटाव मिल पंपाऊंडमध्ये मोंटे साऊथ या 62 मजली इमारतीच्या दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर शनिवारी मध्यरात्री भीषण आग आगली. रात्री वाऱ्यामुळे ही आग पसरल्यामुळे आगीची भीषणता वाढली. त्यामुळे परिसरात धुराचे लोण पसरले. या मजल्यावरील रहिवासी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्याने बचावले. दरम्यान, घटनास्थळी तातडीने पोहोचून अग्निशमन दलाने बचावकार्य करत 30 जणांची सुखरूप सुटका केली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

भायखळा पश्चिम येथील बापूराव जगताप मार्गावरील खटाव मिल पंपाऊंडमध्ये नव्याने बांधण्यात आलेली तळमजला अधिक 62 मजली मोंटे साऊथ इमारत आहे. या इमारतीतील दहाव्या मजल्यावरील रूम नंबर 1002 व 11 व्या मजल्यावरील रूम नंबर 1102 मध्ये शनिवारी रात्री 11.45 वाजता आग लागली. या घटनेत दोन्ही घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, पडदे, लाकडी बेड, सोफा जळून खाक झाले.

आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. आग नियंत्रणात आणल्यानंतर जवानांकडून कुलिंग ऑपरेशन सुरू असताना आग्रीपाडा ठाण्याचे पोलीस हवालदार पांडुरंग शिंदे (57) यांच्या नाकाला इमारतीच्या काचेचे दार जोरदार आपटल्यामुळे इजा झाली. नायरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

तीन तासांनी आगीवर नियंत्रण

मोंटे साऊथ इमारतीच्या 10 व्या आणि 11 व्या मजल्यावर लागलेल्या आगीतून बचावकार्याला महत्त्व देत जवानांनी आगीत कोणी अडकले नाही ना याची खात्री करत नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. 4 होस लाईन आणि 9 बंबांच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री 2.45 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले.

अडकलेल्या रहिवाशांची सुटका    

अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जवानांनी बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. बचावकार्य सुरू असताना 11 व्या मजल्यावर धुरात अडकलेल्या महिला, मुले अशा 30 रहिवाशांना पायऱ्यावरून सुखरूप बाहेर काढण्यात आले. एका 75 वर्षांच्या वृद्धाला चालता येत नसल्यामुळे दोन जवानांनी हातीची खुर्ची करत त्यावर बसवले आणि पायऱ्यावरून खाली आणले.