दक्षिण मध्य मुंबईतील महत्त्वाचा शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, असे निर्देश देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या विलंबाबाबत आज शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आवाज उठवला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत वेगाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. दक्षिण मध्य मुंबईतील विकासकामे आणि समस्यांबाबत आज खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शीव उड्डाणपूल बंद झाल्यामुळे होणारी वाहतूककोंडी त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी होणाऱ्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या सद्यस्थितीची माहिती देसाई यांना दिली. शिवाय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाची सद्यस्थितीही त्यांनी जाणून घेतली.
विविध प्राधिकरणांची समन्वय ठेवून कामे करा
जिल्हा नियोजन समितीकडून होणाऱ्या कामांमध्ये अनेक प्राधिकरणांचा संबंध येत असतो. त्यामुळे विविध प्राधिकरणांच्या अंतर्गत येणाऱ्या कामांबाबत होणाऱ्या दिरंगाईबाबत त्यांनी पालकमंत्र्यांसमोर प्रश्नही उपस्थित केले. शिवाय ही कामे पूर्ण करण्यासाठी विविध प्राधिकरणांची योग्य समन्वय साधून ही कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.