Thane News – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, शेजाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये उघडकीस आली आहे. पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने मुलीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

पीडित मुलगी 13 वर्षाची असून आई-वडिल नोकरीला गेल्यानंतर मुलगी एकटी असल्याची साधून आरोपी तिच्यावर बलात्कार करत असे. शेजारी राहणाऱ्या 28 वर्षीय आरोपीने पीडितेशी आधी मैत्री केली. मग आरोपीने पीडितेच्या कुटुंबाशी जवळीक साधली. यानंतर त्याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले.

पीडितेचे आई-वडिल नोकरीला गेले की आरोपी पीडितेच्या घरी येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत अनेकदा आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पीडितेने आरोपीशी संबंध ठेवण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने पोलिसात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.