तरुणीला छळणाऱ्या विकृत निलंबित कॉन्स्टेबलला अटक

36

सामना ऑनलाईन । मुंबई

अश्लील व बदनामीकारक मेसेज करून महिला व तरुणींना नाहक छळणाऱ्या एका विकृत पोलिसाला भोईवाडा पोलिसांनी आज अटक केली. शैलेश कदम (३८) असे त्या कॉन्स्टेबलचे नाव असून तो निलंबित आहे. तरुणींना छळल्याप्रकरणी त्याच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात दोन तर माटुंगा, कणकवली पोलीस ठाण्यांतदेखील गुन्हे दाखल आहेत.

शैलेश कदम हा हिंदमाता येथील एका इमारतीत राहतो. त्याच इमारतीत पीडित महिलेच्या वडिलांचे दुकान आहे. ती तरुणीदेखील दुकानात बसते. हीच संधी साधत शैलेश दुकानाबाहेर ये-जा करायचा. तसेच त्या तरुणीला उद्देशून फेसबुक व व्हॉटस्अॅपवर अश्लील मेसेजचा स्टेटस् ठेवायचा.

शैलेशच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शैलेशला आज अटक केली. त्याच तरुणीने एक वर्षापूर्वी शैलेशविरोधात अश्लील मेसेज करून त्रास देत असल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावेळीही त्याला अटक झाली होती, मात्र त्यानंतरही शैलेशने पुन्हा या तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली होती, असे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनाही छळतो
फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लील मेसेज करून तरुणींना त्रास दिल्याप्रकरणी शैलेशच्या विरोधात चार गुन्हे दाखल आहेत. जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याला अशाच गुह्यांत निलंबित करण्यात आले होते. गेल्या साडेचार वर्षांपासून तो सेवेतून निलंबित आहे. अशा गुह्यांत पकडल्यानंतर शैलेश पोलिसांना टार्गेट करतो. पोलिसांवर विनाकारण कोणतेही आरोप तो करतो.

आपली प्रतिक्रिया द्या