बलात्कार प्रकरणांमध्ये महिलांनाही मिळावी शिक्षा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

24
supreme-court-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग, छेडछाड इत्यादी लैंगिक गुन्ह्यांमध्ये महिलेलाही शिक्षा मिळावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लैंगिक गुन्ह्यांचा त्रास महिलांसोबत पुरुषांनाही होतो, त्यामुळे महिलांना या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याची तरतूद व्हावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

ऋषी मल्होत्रा असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, ‘गुन्ह्याचा संबंध कोणत्याही लिंगाशी निगडीत नसतो, तसाच तो न्यायाच्या बाबतीतही असू नये. कायद्यासमोर सर्वजण समान असतील तर शिक्षेची तरतूद ही महिलांसाठीसुद्धा असायला हवी. ज्या कारणांसाठी पुरुष गुन्हा करतो, त्याच कारणांसाठी स्त्रीसुद्धा गुन्हा करू शकते. बलात्काराच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशा प्रकरणांनी वय, स्थळ आणि लिंग यांच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यामुळे आता या तीन गोष्टींपलिकडे जाऊन कायद्यात सुधारणा आवश्यक आहे’.

‘नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दर २२२ हिंदुस्थानी पुरुषांपैकी १६ टक्के पुरुष हे लैंगिक गुन्ह्यांचे शिकार झालेले आहेत. यातील काहींवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली गेली आहे. महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार नेहमी विचारात घेतले जातात. पण, पुरुषही लैंगिक गुन्ह्याचा पीडित असू शकतो. त्यामुळे महिलांना अशा प्रकरणात शिक्षा मिळायला हवी’, असंही या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या