मालाडमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटाचा तुकडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मालाडचा रहिवाशी असलेला ब्रेन्डन सेराओ या डॉक्टरनं ऑनलाइन डिलिव्हरी अॅपवरून बटरस्कॉच आइस्क्रीमचे कोन मागवले होते. आइस्क्रीम खाताना तोंडात साधारण दीड ते दोन सेंटिमीटर लांब मानवी अवयवाचा तुकडा सापडला. एमबीबीएस डॉक्टर असलेल्या ओर्लेमला हे माणसाचे बोट असल्याचा संशय आला. तिने याबाबत मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यम्मो आइस्क्रीम कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोषींविरोधात कलम 272, 273 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, असे डीसीपी आनंद भोईटे यांनी सांगितले. आइस्क्रीमदेखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
आईस्क्रीम जिथे तयार केले जाते किंवा त्याचे पॅकिंग होते, त्या जागी तपास केला जाईल.
डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱया विरोधात भादंवि कलम 272 (खाद्यपदार्थ भेसळ) आणि 336 (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) या नुसार गुन्हा दाखल केला.
संबंधित कंपनीचे चार गोदाम आहेत. नेमके कोणत्या गोदामातून ते आइस्क्रीमची डिलिव्हरी झाली होती याचा तपास मालाड पोलीस करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात खार येथील एका हॉटेल मध्ये जेवणात उंदीर सापडल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली होती.
आइस्क्रीम खाताना तोंडात एक तुकडा आला. अगोदर मला वाटलं की तो आइस्क्रीमचाच काही घटक असेल. मात्र, जेव्हा मी तो तुकडा नीट बघितला तेव्हा लक्षात आलं की हा मांसाचा तुकडा आहे आणि त्याला नखदेखील आहे. ते मानवी बोट असल्याचा संशय आला. हे बघून मी फार घाबरलो. त्यानंतर पोलिसांना पुरावा दाखविण्यासाठी मी तो तुकडा बर्फात ठेवला. डॉ. सेराओ