अ. र. कुलकर्णी

88

>> प्रशांत गौतम

अ. र. कुलकर्णी
ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठी विश्वकोशचे सेवानिवृत्त माजी संपादक अ. र. कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि समीक्षा क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ८१ व्या वर्षी चिरंतनाच्या प्रवासाला गेले आहे. मुंबईत शिक्षण घेतलेल्या कुलकर्णी यांना त्यांचे परिचित मित्रमंडळी अ. र. या नावाने संबोधत. कुलकर्णी यांनी काही काळ रेल्वेमध्ये आणि नंतर दादर येथील शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतरच्या पुढील काळात ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपर्कात आले आणि तेथेच त्यांच्या लेखनाची आणि संपादन कार्याची कारकीर्द बहरण्यास प्रारंभ झाला आणि वाई हीच खरी कर्मभूमी त्यांनी शेवटपर्यंत मानली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वकोशच्या पहिल्या खंडापासून अ. र. यांचा सक्रिय सहभाग राहिला. तर्कतीर्थांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी विसावा खंड प्रकाशित होईपर्यंत समर्थपणे सांभाळली. सेवानिवृत्तीनंतरही ते संपादन कार्यात व्यस्त होते. संपादनासोबत त्यांचा इंग्रजी भाषेचाही उत्तम व्यासंग होता. इंग्रजीतील अनेक उत्तम ललित लेख, कथा, कादंबऱ्या त्यांनी वाचल्या. मराठीसोबतच इंग्रजी साहित्यातही व्यासंग वाढल्याचा लाभ त्यांना विश्वकोश निर्मिती प्रक्रियेत झाला. मराठी आणि इंग्रजी साहित्य आणि साहित्यिकांबरोबर धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयाची त्यांनी आशयपूर्ण मांडणी केली व प्रमाणभूत विवेचनही केले. तेच त्यांच्या संपादन कौशल्याचे वैशिष्ट्य़ होते. सॉलिटरी क्रिपर्स, ऐरतीर, पैलतीर, सांजसूर, तळ्य़ाकाठच्या सावल्या आणि अलीकडेच प्रकाशित झालेला कांतार हे कथासंग्रह लोकप्रिय झाले. या संग्रहातील ‘तळ्य़ाकाठच्या सावल्या’ या कथासंग्रहास २००९ साली राज्य पुरस्कार लाभला होता. तसेच सिटी ऑफ जॉय या त्यांनी अनुवादित केलेल्या साहित्यकृतीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आणि रोटरी क्लब पुरस्काराच्या सन्मानाने गौरविण्यात आले. वाईतील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेशी त्यांचा निकटचा स्नेह होता. सिनेसृष्टीतील आघाडीचे मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचे ते गुरू हेते. अ. रं. यांच्या जाण्याने साहित्य आणि समीक्षा क्षेत्राची हानी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या