महसुल सहायकास तीन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले; जालन्यात लाचलुचपत विभागाची कारवाई

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले महसुल विभागाचे महसुल सहाय्यक श्रीकृष्ण अशोक बकाल यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजाराची लाच घेताना सापळा रचुन जालना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी भोकरदन तहसील कार्यालयात करण्यात आली.

आरोपी महसुल विभागाचे लोकसेवक श्रीकृष्ण अशोक बकाल(32, रा. शिंगणे नगर, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी बुधवारी एका व्यकीती चारजणांचे भिल्ल तडवी जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन भरून करून तहसिलदार यांच्यामार्फत उपविभागिय अधिकारी कार्यालय येथे पाठविण्यासाठी म्हणुन प्रत्येकी 300 रुपये प्रमाणे असे एकूण 1 हजार 200 रुपये व यापूर्वी आठ फाईली पाठविल्याचा मोबदला म्हणून 2 हजार 400 रुपये असे एकुण 3 हजार 600 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 3 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य करून तीन हजार रुपये लाच पंचांसमक्ष स्विकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुपत विभाग परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना युनिटचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, तसेच तपास व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक एस.एस. शेख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अमंलदार गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख, जमदाडे, सुभाष नागरे, हे हाते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.