पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

1771

सामना ऑनलाईन । मुंबई

लडाखमधील हिंदुस्थानच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉप्रिंग या ठिकाणी २१ ऑक्टोबर १९५९ साली दहा जवान गस्त घालीत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. पण दहा जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. नायगाव येथील पोलीस मैदानात शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, डॉ. रणजीत पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नितीन परब

वाहतुकीचे नियमन करताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पोलीस हवालदार नितीन परब यांचा मृत्यू झाला. परब हे प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांना अडीच लाखांचे बक्षीस लागलेले तिकीट पडलेले सापडले. हे तिकीट त्या व्यक्तीला त्यांनी परत केले. पोलीस दलात त्यांनी ४२ बक्षिसे आणि चांगल्या नोंदी मिळविल्या.

विलास शिंदे

वांद्रे वाहतूक विभागात काम करीत असताना विलास शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. विविध पोलीस ठाणी आणि शाखांमध्ये काम करताना शिंदे यांना २७ बक्षिसे मिळाली आहेत.

सुरेश तेलामी

भामरागड येथील कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. पोलिसांसाठी शस्त्रांची कुमक एका वाहनातून पाठविण्यात आली. हे वाहन नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाद्वारे उडवून दिले. यात पोलीस शिपाई सुरेश तेलामी यांना हौतात्म्य आले.

आपली प्रतिक्रिया द्या