सांगलीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घरात खेळत असताना कापडी बेल्टचा गळफास बसून सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगली शहरात घडली. अंजली नितीन खांडेकर असे मयत चिमुकलीचे नाव आहे. अंजलीच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंजलीचे वडील नितीन खांडेकर मार्केट यार्डमध्ये हमाली करतात. अंजलीला दोन वर्षाचा भाऊ आहे. घटनेच्या दिवशी अंजलीचे वडील गावी गेले होते. घरी आई, दोन मुलं आणि आजी चौघे जण होते. आईने अंजलीला टीव्हीवर कार्टुन लावून दिले आणि ती आतल्या खोलीत दोन वर्षाच्या मुलाला घेऊन गेली.
काही वेळाने आईने बाहेर येऊन पाहिले अंजली खुंटीला लावलेल्या कापडी बेल्टला गळफास लागलेल्या अवस्थेत लटकताना दिसली. मुलीला असे पाहून आईने एकच हंबरडा फोडला. आईचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले.
शेजाऱ्यांनी अंजलीला तात्काळ सिव्हील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.