‘जय मल्हार’मध्ये खंडेरायाच्या ‘टाका’मागची गोष्ट उलगडणार

सामना ऑनलाईन । मुंबई

जेजुरीधिपती खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. महाराष्ट्राच्या घराघरात खंडेरायाचे ‘टाक’ पूजले जातात. मात्र हे ‘टाक’ पूजण्यामागील गोष्ट अनेकांना माहीत नाही. ही गोष्ट ‘जय मल्हार’ मधून उलगडली जाणार आहे.

खंडोबाचा पराक्रम आणि त्याचा महिमा भक्त मोठ्या जल्लोषात साजराही करतात. मणी आणि मल्लाच्या या संहारासाठी खंडोबाने म्हाळसाकांत हा अवतार घेतला होता. खंडोबा हा शिवाचा तर म्हाळसादेवी पार्वतीचा अवतार. जिथे शिव असतो तिथे शक्तीच्या रुपात पार्वती ही असतेच. मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार करतांना शिवाला म्हणजेच खंडेरायाला या शक्तीची अदृश्य स्वरुपातील सोबत होतीच. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेले आणि हातात खड्ग घेतलेले खंडोबा त्यांच्या सोबतीला तीक्ष्ण भाला घेतलेली म्हाळसा देवी पुढे आपला लाडका श्वान वाघ्या यांनी मिळून मणी आणि मल्लाचा वध केला असा हा प्रसंग सर्वश्रुत आहे.

हाच प्रसंग चितारणारी एक प्रतिमा घरोघरी पूजली जाते. अनेक ठिकाणी ती चांदीच्या पत्र्यात किंवा तांब्याच्या पत्र्यातही कोरलेली बघायला मिळते. धातूंमध्ये कोरलेली ही प्रतिमा खंडोबाचा टाक म्हणूनही ओळखली जाते. ही प्रतिमा निरखून बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यात म्हाळसा खंडेरायाच्या मागे किंवा पुढे बसलेली नसून ती त्यांच्या सोबतीने घोड्यावर स्वार झालेली आहे. त्यांच्या बरोबरीने ती या दैत्यांशी लढते आहे. याचाच अर्थ ती शक्तीरुपाने खंडेरायाच्या सोबत आहे. त्यामुळेच या प्रतिमेचं एक विशेष महत्त्व आहे. आजवर प्रतिमेच्या रुपात असलेली ही गोष्ट पहिल्यांदाच एका भव्य दिव्य स्वरुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर टाकामध्ये कोरलेल्या या प्रतिमेला पहिल्यांदाच चेहरा मिळणार आहे हे विशेष. आपल्या आराध्य दैवताचा हा पराक्रम आणि त्याचा हा ‘म्हाळसाकांत अवतार’ आणि त्यामागची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे जय मल्हार या मालिकेच्या दोन तासांच्या विशेष भागामधून.

याचसोबत म्हाळसा आणि बानूपैकी कुणाला आपल्या मूळ रुपाची जाणीव होणार या प्रश्नाचे उत्तरही या विशेष भागामध्ये बघायला मिळणार आहे. येत्या ८ जानेवारीला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘जय मल्हार’चा हा दोन तासांचा विशेष भाग प्रसारित होणार आहे.

jay-malhar

आपली प्रतिक्रिया द्या