
मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धांत प्रदीप घाणेकर असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कॉलेज प्रशासनाने आज शनिवारी कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे शुक्रवारी डीबीजे महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळली.
कोकणात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दरड कोसळणे, भिंत कोसळणे अशा दुर्घटना घडत आहे. सिद्धांत काल दुपारपासून बेपत्ता होता. सर्वजण त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेही सापडत नव्हता. अखेर त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. मोबाईलचे लोकेशन डीबीजे महाविद्यालयाच्या कोसळलेल्या भिंतीजवळ दाखवले.
मोबाईल लोकेशनच्या आधारे शनिवारी सकाळी भिंतीजवळ जाऊन ढिगारा बाजूला केला असता आत सिद्धांतचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सिद्धांत हा मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो लोटे येथे राहून डीबीजे कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होता.