फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याची कागदपत्रे रोखू शकत नाही! मेडिकल कॉलेजला हायकोर्टाने ठणकावले

वसतिगृहाची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याची कागदपत्रे रोखणाऱया टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. विद्यार्थ्याने फी भरली नाही म्हणून त्याची कागदपत्रे रोखणे चुकीचेच आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच विद्यार्थ्याकडून 44 हजार रुपयांऐवजी केवळ 10 हजार रक्कम भरून घेत त्याला तातडीने संबंधित कागदपत्रे देण्याचा आदेश महाविद्यालयाला दिला.

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱया यश बजाज या विद्यार्थ्याने टोपीवाला महाविद्यालयाच्या आडमुठय़ा धोरणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. आर्थिक अडचणीमुळे वसतिगृहाची सहा हजार रुपयांची फी आणि दंडाची रक्कम भरता आली नाही. ही रक्कम आता 44 हजार रुपये झाली आहे. या थकीत रकमेमुळे महाविद्यालय व्यवस्थापनाने गुणपत्रिका व इतर शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवली आहेत. वास्तविक, महाविद्यालयाने नियमाविरुद्ध दंड आकारून फीची थकबाकी फुगवली आहे, असा दावा यश बजाजने याचिकेत केला. त्याच्या दाव्यावर पालिकेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याची कागदपत्रे रोखून धरण्याचा निर्णय पूर्णपणे न्यायसंगत आहे, असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने फीच्या कारणावरून विद्यार्थ्याची कागदपत्रे रोखून धरण्याचा महाविद्यालयाचा निर्णय चुकीचा ठरवला. जर याचिकाकर्ता विद्यार्थी वसतिगृहाच्या फीच्या रूपात दहा हजार रुपये जमा करून त्याची पावती सादर करीत असेल तर महाविद्यालयाने त्याला तातडीने त्याची कागदपत्रे परत करावीत, असे आदेश खंडपीठाने दिले. याप्रकरणी 10 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.