दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

34

सामना ऑनलाईन । मुंबई

गोवंडी येथून मित्रांसोबत हाजी अली दर्ग्याजवळ फिरण्यासाठी आलेल्या एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. आवेश शहबाज खान (१६) असे या तरुणाचे नाव असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.

गोवंडीच्या कमला रामनगर परिसरात राहणारे पाच मित्र शुक्रवारी दुपारी हाजी अली दर्गा येथे दर्शनासाठी आले. दर्शन घेतल्यानंतर ते सर्व दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस समुद्रकिनारी गेले. ओहोटी असल्याने थोडे पुढे जाऊन बसले. काही वेळाने भरती सुरू झाली आणि पाणी वाढू लागले. याचवेळी खडकावर मस्ती करत असताना आवेश पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. उशिरापर्यंत शोधल्यानंतरही आवेश सापडत नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी कळविले. घरच्यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.

ताडदेव पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण काळोखात आवेश काही सापडेना. शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली त्यावेळी दुपारच्या सुमारास आवेशचा मृतदेह हाती लागला. ताडदेव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नायर रुग्णालयात पाठविला. आवेश सायंकाळी बुडाला आणि त्याच्या मित्रांनी याबाबत रात्री माहिती दिली. एवढा विलंब का केला याबाबत पोलीस चौकशी करीत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या