
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकींवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने योगेश रामदास चव्हाण (वय 30 सातारा, सध्या राहणार वांद्री ), रोहित मोहन चव्हाण (वय 25 सातारा सध्या राहणार वांद्री) दुचाकीवरून येत असताना धामणी येथील अथर्व क्लीनिक च्या समोर रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकी चालक घाबरून गेल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी थेट गाईला जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले.दुचाकीची गाईला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की गाय काही अंतरावर पडली व तेथेच ठार झाली.
अपघाताची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यानी दीपेश राऊत व सौरभ फटकरे यांना देताच या दोघांनी वेळ न घालवता रुग्णवाहिका त्या ठिकाणी नेऊन अपघातात जखमींना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तर अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय मनवल, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे हे ही पोहचले. दुचाकीवरील एका प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव सुरु होता. तर दुसऱ्या प्रवाशालाही गंभीर दुखापत झाल्याने येथील डॉक्टर रिशप सिंग यांनी प्राथमिक उपचार करून दोघांनाही अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

























































