महिला वकिलाच्या घरी दागिने, रोख रक्कम आणि कोर्टाच्या कामकाजाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरट्याने पोलिसांच्याच हातावर तुरी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात वेद्यकीय चाचणीसाठी नेले असता चोरट्याने संधी साधून पलायन केले. किरण बबन कोळपे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी गुरुवारी दुपारी अॅड. नाजमीन वजीर बागवान यांच्या घरी घुसला. त्यानंतर त्याने बागवान यांचा हात पिरगळत त्यांना मारहाण केली. तसेच बागवान यांच्या घरातीत कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि आरोपीविरोधात दाखल मोक्का कोर्ट केस कामकाजाची मूळ कागदपत्रे नेली.
याप्रकरणी बागवान यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शुक्रवारी पुन्हा आरोपीने बागवान यांचा पाठलाग केला. बागवान यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर कोतवाली पोलिसांनी चांदणी चौक परिसरात त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र पोलिसांनी योग्य खबरदारी न घेतल्याने सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे.
किरण कोळपे विरोधात 2022 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचे वकीलपत्र फिर्यादी यांच्याकडे होते. त्यावेळी फिर्यादी व किरण यांची ओळख झाली होती. दरम्यान, किरण विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाजही फिर्यादी पाहत होत्या. त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला होता.