नेटकऱ्यांची ‘व्हर्च्युअल दिंडी’, फेसबुकवर वारीचे लाइव्ह अपडेट

56

सामना प्रतिनिधी । मुंबई

आषाढ महिना जवळ आला की वारकऱयांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. तसेच इंटरनेटकऱ्यांना ‘व्हर्च्युअल दिंडी’चे वेध लागले आहेत. यंदाही वारीची माहिती आणि लाइव्ह अपडेटस् फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पाहता येणार आहेत. त्यासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज स्वप्नील मोरे यांनी तयार केलेल्या ‘फेसबुक दिंडी: अ व्हर्च्युअल दिंडी’ या पेजचे यंदाचे सातवे वर्ष आहे. जगभरातून कोटय़वधी नेटकऱ्यांनी या व्हर्च्युअल दिंडीत सहभागी होऊन मनोमन विठ्ठलनामाचा गजर केला आहे.

‘पंढरीचा वारकरी …वारी चुको न दे हरी’ संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणेच विठ्ठलभक्तांना दरवर्षी पंढरीच्या वारीची ओढ लागते. पण वारीला जाणे शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी स्वप्नील मोरे यांनी ‘फेसबुक दिंडी’ हे पेज सुरू केले. देहूहून निघालेल्या तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक घटनेचे फोटो, व्हिडीओ आणि माहिती या फेसबुकवर द्यायला त्यांनी सुरुवात केली. या हायटेक दिंडीला जगभरातून कोटय़वधी हिटस् मिळाल्या.वारीची परंपरा एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जाते तशीच स्वप्नीलने नेटकरी तरुणवर्गाच्या खांद्यावरही वारीची पताका दिली आहे. या फेसबुक दिंडीवर फोटो, व्हिडीओ, लाइव्ह अपडेट, ऑनिमेशन, कॅलिग्राफीसाठी मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी अशी भलीमोठी टीम आहे.

घोड्याच्या कपाळावर ‘गोप्रो’ कॅमेरा

उभे रिंगण, गोल रिंगण याबरोबरच व्हर्च्युअल दिंडीत वारीदरम्यानचे अनेक लाइव्ह क्षण बघायला मिळतात. तुकोबांची पालखी नेमकी कुठे आहे याची माहिती मिळण्याकरिता पोलिसांच्या सहकार्याने या टीमने तुकोबांच्या पालखीला जीपीएस यंत्रणा लावली आहे. घोडय़ाच्या कपाळावरच ‘गोप्रो’ प्रकारचा खास कॅमेरा लावून घोडय़ाच्या नजरेतून रिंगण दाखवण्याचा प्रयोगही त्यांनी केला आहे. प्रत्यक्ष पाण्यात उतरून काढलेले नीर स्नानचे फोटोही इथेच बघायला मिळतात. संत तुकारामांचे पुत्र नारायणराव यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी एकत्र नेण्याची प्रथा सुरू केली होती, मात्र पुढे ही प्रथा मोडली. स्वप्नील यांनी या दोन्ही पालख्यांचे एकत्र अपडेट देऊन व्हर्च्युअली या पालखी पुन्हा एकत्र आणल्या आहेत.

कधी आणि कुठे

फेसबुकवर व्हर्च्युअल दिंडी हे शब्द टाकताच त्याचे पेज ओपन होईल. पेज लाइक केल्यानंतर तुम्हाला इव्हेंटची लिंक जॉइन करावी लागेत. संत तुकारामांची पालखी 16 जूनला देहू येथून निघणार आहे. तेव्हापासून या फेसबुक पेजवरील लिंकवर अपडेट पाहायला मिळणार आहेत. तसेच ‘फेसबुक दिंडी’ या ऍपवरही अपडेट मिळू शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या