मातृत्वाला काळीमा; मुलाच्या तोंडात मोजा कोंबून आईनेच घेतला जीव

1024
प्रातिनिधीक फोटो

चंदीगढमध्ये मातृत्वाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पंजाबमधील एका महिलेने स्वत:च्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोपी महिलेला पंजाब पोलिसांनी पठाणकोट येथून अटक केली आहे.

चंदीगढ शहरात आईने स्वत:च्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुपा कुमारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. रुपाने शनिवारी स्वत:चा अडीच वर्षाचा मुलगा दिव्यांशु याच्या तोंडात मोजा कोंबून त्याला पलंगात बंद करून ठेवले आणि त्यानंतर ती फरार झाली. आरोपी महिलेचा पती दशरथ इलेक्ट्रीशिअन असून, घटनेच्या दिवशी सकाळी कामाला गेला होता, रात्री घरी परतला. तेव्हा दरवाजाला बाहेरून कडी असल्याचे त्याच्या लक्षात आले. पत्नी नातेवाईकांकडे गेली असावी असा त्याचा अंदाज होता. दुसऱ्या दिवशी देखील तो नेहमी प्रमाणे कामावर गेला. मात्र कामावरून घरी परतल्यावर एका अज्ञात क्रमांकावरून त्याला पत्नी रुपाचा फोन आला. तेव्हा तिने मुलगा पलंगात बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर दशरथने पलंगातून मुलाला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

या घटनेनंतर दशरथने त्वरित चंदीगढ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रुपा कुमारीला अटक केली आहे. चौकशी दरम्यान रुपाने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, याआधीही रुपाच्या सहा महिन्याच्या मुलीचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. दशरथ आणि रुपा हे दोघेही मुळचे बिहारचे आहेत. दशरथ वर्माचा रुपाशी विवाह 2016 साली झाला होता. तर दिव्यांशुचा जन्म 2017 साली झाला होता. तर मुलगी कोमल हिचा जन्म 2019 साली झाला होता. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात पत्नीशी खूप भांडण व्हायचे आणि पत्नी घरातील कामही करायचे नाही. या घटनेनंतर तर मुलीच्या मृत्यू मागे देखील पत्नी रुपाचाच हात असल्याचा संशय दशरथने व्यक्त केला. तसेच ती माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवणार होती, असा गंभीर आरोप ही दशरथने पत्नीवर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या