शेतात काम करताना अंगावर वीज पडली, कुटुंबाच्या डोळ्यादेखत महिलेला दुर्दैवी मृत्यू

शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वर्धा येथे घडली. अश्विनी पांगुळ असे वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हिंगणघाट तालुक्यातील कुटकी शेत शिवारात दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अश्विनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडनेर येथील रुग्णालयात पाठवला.

पांगुळ यांच्या शेतात नुकतेच निंदणाचे काम झाले होते. शेतात अश्विनी यांच्यासोबत त्यांचे पती नामदेव पांगुळ, लहान दीर आणि जाऊ हे देखील उपस्थित होते. निंदणाचे काम करून रोजगार महिला जेवणासाठी बसल्या होत्या. यादरम्यान निंदण झालेले पुंजाने उचलण्यासाठी गेलेल्या अश्विनी पांगुळ यांच्या डोक्यावर वीज पडली. वीज पडल्याने अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेच्या पंधरा मिनिटांपूर्वीच अश्विनीने आपल्या सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला आणि तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला वातावरणात झालेल्या बदलामुळे घरी पाठवले होते. अश्विनी आपल्या पती आणि घरच्या लोकांसोबत शेतातच काम करत होती. अवघ्या दहा फुटाच्या अंतरावर असलेल्या नामदेव पांगुळ यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पत्नीच्या जीव गेला. अश्विनीच्या अपघाती मृत्यूने पांगुळ परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.