लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात महिला वकिलाचा विनयभंग, सीसीटीव्ही आधारे आरोपीचा शोध सुरू

मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचे अभिमानाने सांगितले जात असताना काल चालत्या लोकलमध्ये जोगेश्वरी येथे एका 25 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संशयित 40 वर्षीय आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याआधारे त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोरेगावला जाणाऱया हार्बर लोकलमधील प्रथम श्रेणी डब्यातून 25 वर्षीय महिला वकील प्रवास करत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. या डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या वेडसर इसमाने त्या जोगेश्वरीला उतरण्याच्या बेतात असतानाच त्यांचा विनयभंग केला आणि पळून गेला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इसम अर्धनग्नावस्थेत असून संबंधित लोकलच्या प्रवासात प्रत्येक स्थानकावर तो उतरून पुन्हा त्याच गाडीत तो चढत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून त्याला अटक करण्यासाठी 4 पथके नेमण्यात आली असून तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त पैसर खलिद यांनी सांगितले.