१९व्या वर्षी मृत्यू, पण ६ जणांना देणार जीवदान

अभय मिरजकर, लातूर

मृत्युनंतर अवयवदान केल्यास आजारी व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकतं. त्यासाठी अवयवदानासंबंधी सगळीकडे जागृती केली जाते. लातूर येथेही एका दाम्पत्याने आपल्या तरुण मुलाच्या मृत्युपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. किरण लोभे असं या १९ वर्षीय मुलाचं नाव आहे. किरणचं हृदय, यकृत, दोन्ही डोळे, दोन्ही किडनी दान करण्यात येणार आहे, अशी माहिती लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली आहे.

किरणला काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. त्याच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी संध्याकाळी डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केलं. डॉक्टरांनी किरणच्या आईवडिलांना परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी किरणचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबर लातूरच्या रुग्णालयातून मुंबईत संपर्क केला गेला. अवयव नेण्यासाठी स्थानिक यंत्रणा सज्ज झाल्या असून रुग्णालय ते लातूर विमानतळापर्यंत अवयव नेणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कोरिडोर बनवण्यात आला आहे. अवयवदानासंबंधी आता जनजागृती होत असून लातूर येथील अवयवदानाची ही पहिलीच वेळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या