बार वेट्रेसवर बलात्कार प्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

26

सामना ऑनलाईन । ठाणे

बारमध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने एका तरुणाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच आरोपीला १५ हजार रुपये इतका दंडही ठोठावला आहे. २०१६ मध्ये या तरुणाने एका बार वेट्रेसला जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला होता.

अजय चौरसिया (३३) असं या तरुणाचं नाव असून तो पीडिता ज्या बारमध्ये काम करत होती, तिथे वरचेवर जात असे. त्यामुळे तिची आणि अजयची ओळख होती. १३ ऑगस्ट २०१६ रोजी जेव्हा ती बारमधली आपली ड्युटी संपवून घरी निघाली होती, तेव्हा अजयने दुचाकीवर तिचा पाठलाग केला. जेव्हा तिची गाडी थांबली तेव्हा त्याने जबरदस्तीने तिला गाडीतून उतरवून एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे एका खोलीत नेऊन तिला चामडी पट्ट्याने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने स्वतःला खोलीच्या बाथरूममध्ये कोंडून घेत पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाला होता, असा फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद होता.

आरोपीच्या वकिलांनी पीडितेवर आरोप करताना म्हटलं की, तिचे आणि अजयचे संबंध होते. त्यासाठी ती त्याला ब्लॅकमेल करत होती. त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्याची धमकीही तिने त्याला दिली होती. त्याबदल्यात ती त्याच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी करत होती. ज्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. खालिपे यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला आणि अजय याला शिक्षा ठोठावली.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, बचाव पक्षाच्या वकिलांनी पीडितेवर केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. तक्रारीत नमूद केलेल्या घटना, पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांचा एकमेकांशी ताळमेळ बसत आहे. याखेरीज पीडितेच्या वैद्यकीय चाचणीत तिच्यावर जबरी बलात्कार तसंच चामडी पट्ट्याने मारहाण केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांचा कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या