नाशिक, दिंडोरी, सिन्नरमध्ये माऊली संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

1260

महाराष्ट्राचे लाडके भावोजी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी स्त्री शक्तीला सलाम करीत माऊली संवाद यात्रेंतर्गत महिलांच्या समस्या, त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेची आवश्यकता, शाळांसमोर सीसीटीव्ही बसवावेत, ज्येष्ठ महिलांना आणि कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे अशा त्यांच्या एक ना अनेक प्रश्नांची आदेश बांदेकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. माऊलींनो, शिवसेना तुम्हाला न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यभरातील कष्टकरी भगिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे माऊली संवाद यात्रा करीत आहेत. नाशिक शहरातील कामटवाडे येथील माऊली लॉन्स येथे शुक्रवारी सकाळी या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर दिंडोरीतील संस्कृती लॉन्स आणि सिन्नरमधील नर्मदा लॉन्स येथेही आदेश बांदेकर यांनी हजारो माऊलींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांची लेखी नोंद घेतली.

यावेळी महिलांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज या प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जाण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांसमोर सीसीटीव्ही बसविले जावेत, ही मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा, असे एक माऊली यावेळी म्हणाली, राज्यातील माऊलींच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या प्रश्नाचा पाठपुरावा करीत असल्याचे बांदेकर यांनी सांगितले. तुमचे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोडवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सिद्धीविनायक ट्रस्टचा पुढाकार
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले आणि शहीद जवानांची मुले यांचा ‘केजी टू पीजी’ या शिक्षणाचा खर्च सिद्धीविनायक ट्रस्ट उचलत आहे, असे आदेश बांदेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या