आधार लिंक करा आणि हवी तेवढी तिकीटे काढा

19

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आधारसक्ती आता अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार, सरकारी सेवेचा लाभ यासाठी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसी कंपनीने अभिनव योजना आणली आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर अकाउंट सुरू करणाऱ्यांनी त्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्यास संबंधित व्यक्तीला एका महिन्यात सहाऐवजी बारा तिकिटांची खरेदी करता येणार आहे. याआधी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन एका महिन्यात एका अकाउंटद्वारे जास्तीत जास्त सहा तिकिटांची खरेदी करता येत होती.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा प्रवाशांनी ऑनलाइन तंत्राचा वापर वाढवावा. तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन मोठ्या प्रमाणावर तिकिटांची खरेदी करावी या हेतूने नवी योजना लागू करण्यात आली आहे. आयआरसीटीसीवर माय प्रोफाईल हा पर्याय निवडून अपडेट यूअर आधार हा पर्याय क्लिक करून तिथे आधार कार्ड लिंक करणे शक्य होणार आहे. आधार कार्ड लिंक करण्यासाठी मोबाईल क्रमांकावर एक वन टाईम पासवर्ड येईल तो एंटर करून आधार आणि आयआरसीटीसी यांना जोडणे शक्य होणार आहे.

आयआरसीटीसी अकाऊंटच्या ‘मास्टर लिस्ट’ मध्ये ज्यांच्यासोबत आपण प्रवास करणार आहोत त्यांची नावेही अपडेट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तिकिटे बुक करतानाच मास्टर लिस्ट अपडेट करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. आयआरसीटीसीशी आधार लिंक केल्यास रेल्वे प्रवाशांना काही सुविधा पुरवणार असल्याची घोषणा मागील वर्षी डिसेंबर मध्येच करण्यात आली होती. मात्र विरोधकांनी या निर्णयाला तेव्हा विरोध केला होता त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला होता. नव्याने निर्णय लागू करताना ज्यांना आधार क्रमांक द्यायचा नाही अशांना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दरमहा जास्तीत जास्त सहा तिकिटांची खरेदी करण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या