मातीतील ‘ती’ आदिमाया.

आसावरी जोशी

ती आदिमाया… अनादी… अनंत… संपूर्ण विश्वाची उत्पत्ती तिच्यातून… तिच्या एका सर्जनशील हुंकारातून… ती शक्ती… ती युक्ती… शिवाचे अर्धांग असली तरी त्याला पूर्णत्व तिच्यामुळेच… कारण ती स्वतः परिपूर्ण… संपूर्ण… आत्मरूपा… या सृष्टीतील प्रत्येक हालचालीत तिचा अत्यंत हवाहवासा हस्तक्षेप… आणि त्या प्रत्येक घडामोडीत तिचा आत्यंतिक जिव्हाळा गुंतलेला… तिच्यातील मातृत्व सदोदित जागते… सजग… म्हणूनच तिचे नाते अत्यंत घट्ट रुजले आहे धरित्रीच्या लाल काळ्या मातीशी… म्हणूनच या मातीतून सगुण साकारणे तिला भावते… ती नेहमीच आतुरलेली हिरवाईतून बहरण्यासाठी… कधी हिरवाईतून… तर कधी सर्जनशील हातातून… तिची साकारणारी रूपं विविध असली तरी माध्यम एकच… माती… या मातीतूनच तिची नाळ आपल्यापैकी प्रत्येकाशी जोडली गेली आहे…

आपली संस्कृती… आपले देव एवढेच काय तर पर्यायाने आपण माणसेदेखील अत्यंत उत्सवप्रिय… कोणत्याही गोष्टीचा आपण उत्सव साजरा करतो… अगदी नऊ दिवस चालणाऱया युद्धाचाही.. अनिष्टाचा… अमंगलाचा… दुर्गतीचा नाश करण्यासाठी ती या पृथ्वीतलावर उतरते… पण त्यासाठीही तिचे माध्यम मातीमाय… या नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी आत्मतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने भूतलावरील त्रासदायक तत्त्वांचे समूळ उच्चाटन करणे!

ही देवी उपासना आपल्यासाठी सोपी जावी… ती आपल्यातीलच एक वाटावी यासाठी ती घराघरातून अवतरते… घटस्वरूपात… मातीतून उगवणाऱया तृणांकुराच्या रूपात… हा काळ ऋतुपरिवर्तनाचा असतो. यामुळे आपल्यात नवी शक्ती, नवी उमेद, नवा उत्साह निर्माण होत असतो.

सृष्टीतील हे परिवर्तन हा या शक्तीचाच खेळ असतो. या नऊ दिवसांच्या काळात तिचे तत्त्व १००० पटीने कार्यरत झालेले असते. त्यामुळे या दिवसांत देवी उपासना केल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. त्यामुळे तिच्या प्रकटण्याचा काळ हा खऱया अर्थाने नवनिर्माणाचा, उन्नतीचा आणि सर्जनाचा काळ असतो असे म्हटले तरी चालेल.

तिची ही सर्जनशीलता आपल्या घरात प्रगटते ती मातीतून… मातीच्या वेदीवर घटावर पसरलेल्या ताम्हणात देवघरातील देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या मातीत सात प्रकारची धान्ये पेरली जातात. यातून उगवल्या जाणाऱया तृणांकुरातून ती प्रगटते. मातीइतकीच तिला झेंडूची फुले अतिप्रिय… चढत्या क्रमाने झेंडूच्या फुलांच्या माळांनी तिचा घट सजतो. ग्रामीण भागात असे म्हटले जाते की या काळात पाऊस पडलाच तर तो माळेत सापडेल आणि किमान नऊ दिवस तरी तो पडू शकणार नाही. आज या आख्यायिकेची आपल्याला खरंच गरज आहे…

तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट ही मातीतूनच उत्पन्न झालेली… कापसाच्या वातीचा दिवा, दीप हे तेजाचे प्रतीक आहे. अखंड दीप लावल्याने ब्रह्मांडातील शुभ लहरी, ब्रह्मतेज दिव्याकडे आकर्षिल्या जातात.

तिच्या घटासमोर रांगोळीने शुभ चिन्हे काढली जातात. रांगोळी आणि विशिष्ट शुभ चिन्हांमुळे शक्तितत्त्व आकर्षित होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. येथे रांगोळीचे महत्त्वही सिद्ध होते.

वंग संस्कृतीत दुर्गा प्रत्येकाच्या घरात अवतरत नाही. यामागचे कारण मोठे गमतीशीर आहे. ती आपल्या संपूर्ण परिवारासहित पृथ्वीवर उतरते. गणेश, कार्तिकेय, लक्ष्मी, सरस्वती. मग या मोठय़ा कुटुंबासाठी जागाही भव्य हवी. म्हणून तिची पूजा मोठय़ा मंडपात साकारली जाते. येथेही तिची मूर्ती घडविण्यासाठी पहिली माती ही वेश्यालयाच्या अंगणातून आणली जाते. आपण सगळ्या तिच्या लेकी. त्यामुळे कुणालाही ती दूर तर सारत नाहीच, पण सगळ्यांना बरोबर घेऊन ती पुढे निघाली आहे. तिचे हे आईपण तिच्या साध्या साध्या कृतीतून व्यक्त होत जाते.

आपल्या प्रत्येक रूपातून, रुचीतून ती तिचं आपल्यात असणं, गुंतणं वारंवार सिद्ध करते. आपल्यासारख्याच  मानवी भावभावना तिला आहेत. तिची ही नऊ रूपं आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्यातून सहज प्रगटतात… असं म्हणतात साधेपणा गहन असतो. ही तिची साधी, मनोहारी रूपं तिच्या लेकींची म्हणजेच आपल्या जगण्याची प्रतीकं आहेत. तिच्यापासूनच आपण ऊर्जा घेतो… आणि रोज नव्या संघर्षाला तयार होतो.

तिची नऊ रूपं

शैलपुत्री…ही दुर्गा दृढ निश्चयाची आणि कठोर तपाची शिकवण देते. कारण कठोर तपाने तिने शंकराला प्राप्त केले.

ब्रह्मचारिणी…एखाद्या विद्येत, साधनेत ब्रह्मपद प्रदान करणारी. उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात कमंडलू असे तिचे तेजोमय स्वरूप.

चंद्रघंटा…कल्याणी, शांतीदायक दशभुजा स्वरूप. हिच्या पूजनाने कष्टांतून मुक्तता होते.

कुष्मांडा…अष्टभुजा. कुष्मांड म्हणजे कोहळा. येथे ती युद्धसज्ज आहे. वाईटाचे प्रतीक म्हणून कोहळ्याचा बळी दिला जातो.

स्कंदमाता…कमळावर विराजमान शुभ्रा.

कात्यायनी…ऋषीकुलातून उत्पन्न झालेली. प्रसन्नरूपा.

कालरात्री…काळे शरीर असलेली, त्रिनेत्रधारी, खड्ग धारण केलेली… उग्रा.

महागौरी…शुभ्रा. शुभ्र वस्त्र परिधान केलेली. अत्यंत जागृत आणि सजग.

सिद्धीदात्री… हिच्या साधनेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. मनोकामना पूर्ण होतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या