महापालिका विद्यार्थ्यांसाठी ‘कसरतमंत्र’!

66

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई – महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता व्यायामाचे अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे धडे मिळणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळीत आज ‘कसरतमंत्र’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्हिडीओद्वारे शरीरस्वास्थ्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सध्याचे विद्यार्थी व्यायाम आणि मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा पूर्ण वेळ अभ्यास आणि मोबाईल गेम खेळण्यामध्येच जात असल्याने त्यांचे शरीरस्वास्थ्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. याचा त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. या पार्श्‍वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातून ‘कसरतमंत्र’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. बॉलीवूड अ‍ॅक्टर आणि फिटनेस ट्रेनर जॉकी भगनानी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, नगरसेविका मानसी दळवी, युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, अंकित प्रभू, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते.
प्रात्यक्षिक, माहिती, मार्गदर्शन आणि व्हिडीओ
व्यायामाची अवजड साधने आणि मैदानी खेळाकडे आजचे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. या पार्शभूमीवर व्यायामाचे सोपे, मात्र अत्याधुनिक प्रकार असलेला अर्ध्या तासाचा व्हिडीओ प्रोग्रॅम बनवण्यात आला आहे. यासाठी महागडी साधने विकत घेण्याचीही गरज राहणार नाही. अत्यंत कमी साधनांसह हे व्यायाम घरबसल्याही करता येणार आहेत. आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या टॅबमध्येही हा प्रोग्रॅम देण्यात येणार आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, माहिती, मार्गदर्शन करणार्‍या व्हिडीओचा समावेश असेल. या उपक्रमात परदेशी फिटनेसतज्ज्ञांकडून महापालिका शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
‘कसरत’मुळे विद्यार्थ्यांना फिटनेसचा खरा अर्थ समजण्यास मदत होणार आहे. यामुळे त्यांचे शरीस्वास्थ्य उत्तम राहणार असून त्यांची सहनशक्ती आणि आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आपोआपच अभ्यासही चांगला होईल.
– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

आपली प्रतिक्रिया द्या